करोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
एमपीएससीकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
करोना विषाणू संसर्गामुळे एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न राज्यभरातील उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत होता. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडूव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.
एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आता वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे. तसेच करोना विषाणू संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून घेण्यात येईल. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे