नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ च्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी तारखेत दोनवेळा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या तारखेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षा होणार असल्याने पुन्हा एकदा एमपीएससीतर्फे परीक्षेची तारीख बदलली आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार २० सप्टेंबरला परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे बुधवारी (ता.१२) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्याचे कळविले आहे. २३ डिसेंबर २०१९ ला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१९ यापूर्वी ५ एप्रिलला घेण्याचे प्रस्तावित होते. परंतु कोरोना विषाणुमूळे उद्भवलेल्या परीस्थितीत परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय होता. यानंतर १७ जूनला जारी केलेल्या परीपत्रकानुसार ही परीक्षा १३ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले होते.
‘या’ तारखेला होणार परीक्षा
राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देशपातळीवर घेण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विषयांकित राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही २० सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कमृचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.